पुरुषाचं हे वागणं स्त्रीसाठी मात्र नक्कीच गोंधळात टाकणारं असतं.
तिला हे कळत नाही की तिच्याकडून अशी कोणती आगळीक घडली आहे की तिच्याशी नवरा
असा वागतोय?
तिला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं असतं, पण तो सरळ पायात चप्पल सरकवून घराबाहेर पडतो.
पुस्तकात नाहीतर पेपरात डोकं खुपसून बसतो. बोल बोल म्हटलं तरी बोलतच नाही. असं का?
बायकांचे गुणदोष (गुणांपेक्षा दोषच) सांगायला बसलं की वेळ पुरत नाही
असं थट्टेनं म्हटलं जातं. पण गुणदोष, स्वभावाच्या त:हा, भ्रम-विभ्रम हे
फक्त बायकांचंच असतं असं नाही. पुरुषांच्या बाबतीतही हे सर्व असतंच.
पुरुषांच्या मनोविभ्रमाबद्दलही बोलण्यासारखं खूप आहे. पुरुषांच्या
मनोविभ्रमाचा विशेष म्हणजे पुरुष हे रबरबॅण्डसारखे असतात. त्यांच्या गरजा
भागल्यावर ते भानावर येतात आणि भावनिक पातळीवर आपल्या स्त्रीपासून दूर राहू
लागतात. परंतु ते इतकेच दूर जातात की अचानक स्प्रिंगसारखे दुप्पट वेगानं
परत येतात. पुरुष दूर जातो ते त्याची स्वातंत्र्याची किंवा स्वायत्ततेची
गरज भागवण्यासाठी. ती भागली की तो पुन्हा आपल्या नातेसंबंधांना तिथपासूनच
सुरुवात करतो, जिथे तो तिला सोडून गेलेला असतो.
पुरुषाच्या अशा वागण्यात स्त्रीनं स्वत:ला दोषी धरणं हेच मुळी चुकीचं
आहे. खरंतर पुरुषाची ही दूर जाण्याची ओढ नैसर्गिकच असते. तो त्याचा निर्णय
नसतो किंवा आवडही नसते. हे घडायचंच असतं. कारण हे नैसर्गिक चक्र असतं.
पुरुष रबरबॅण्डसारखे असतात हे जर स्त्रियांनी समजून घेतलं नाही तर
संसारामध्ये वादळ घोंगावत राहतं. सर्वसामान्यपणो अधिक संभ्रम तेव्हा होतो
जेव्हा ती म्हणते, ‘आपण बोलू या’ किंवा ‘मला तुङयाशी काही महत्त्वाचं
बोलायचं आहे’ त्याबरोबर तो पायात चपला सरकावतो. तो भावनिकदृष्टय़ा
तिच्यापासून खूपच दूर जातो. त्यावेळी तिला प्रचंड एकटं वाटतं. अशावेळी
बायका अशी तक्रार करतात की, ‘ज्या ज्या वेळी मला त्याच्याशी बोलायचं असतं
त्या त्या वेळी तो तोंड फिरवतो, त्याला माङयाबद्दल काही आस्थाच वाटत
नाही.’
प्रत्यक्षात असं काही नसतं. पुरुषालाही त्याच्या जोडीदाराबद्दल प्रेम,
काळजी, आस्था असं सारं काही वाटत असतं. पण त्याला थोडा वेळ अगदी एकटय़ाला
राहायचं असतं. त्याला स्वत:शी संवाद साधायचा असतो. ती वेळ त्याची एकटय़ाची
असते. म्हणून तर काही पुरुष डोळ्यांसमोर वर्तमानपत्र धरून बसतात, तर काही
तंबाखूचा बार भरतात, तर काही चॅनेलचे सर्फिग करत राहतात जेणोकरून
बोलण्यासाठी तोंड उघडावं लागू नये. पण तरीही कधीतरी त्याच्या मनाच्या
कोप:यामध्ये पुन्हा एखाद्या अशा हळव्या क्षणी प्रीतिचक्र आकार घेते आणि या
हळव्या क्षणाची त्याला गरज वाटते. त्या भावना त्याला पुन्हा त्याच्या
जोडीदाराजवळ घेऊन येतात. याचाच अर्थ हा की ती जे बोलते त्यामुळे तो दूर जात
नाही, तर तिचे टायमिंग चुकते म्हणून तो दूर जातो.
अशावेळी त्याच्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रीनं तिच्या
भावनांना मुक्त करावं. कदाचित त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच.
पुरुषांना बोलण्यासाठी काहीतरी कारण लागतं. म्हणून तिनेच दिलखुलासपणो
त्याच्याशी बोलायला सुरुवात करावी.
जेव्हा तो असा दूर जात असेल तेव्हा ती वेळ त्याच्याशी संवाद
साधण्यासाठी योग्य नव्हे अशी खुणगाठ तिनं मनाशी बांधावी! आणि त्याला खुशाल
दूर जाऊ द्यावं. कारण थोडय़ा वेळानं तो नक्की पुन्हा परत येणार असतो. आणि
जेव्हा तो परत येतो तेव्हा पूर्वीसारखाच प्रेमळ आणि एखाद्या आधारवडाप्रमाणो
भासतो. हीच वेळ त्याच्याशी मनातलं बोलण्याची आणि संवाद साधण्याची असते.
आज ती दिवसभरात कोणकोणत्या दिव्यातून गेली हे सांगितलं तर मग तोसुद्धा
त्याचा दिनक्रम सांगेल. आज त्यानं त्याच्या बॉसवर कशी कुरघोडी गेली हे
खुलवून सांगेल, किंवा कुरघोडी करता आली नसली तर बॉसला चार शिव्या देईल आणि
मोकळा होईल. अशा प्रकारे ते एकमेकांना समजावून घेऊ शकतील.
दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय ओळखून त्या विषयावर बोलावं, पण त्याला
दुषणं देण्याचा प्रय} करू नये. जेव्हा स्त्रीची मागणी त्यानं बोलावं ही
असते तेव्हा पुरुषांसाठी बोलणं फार कठीण असतं. स्त्री गैरसमजानं असं गृहीत
धरते की, ‘बोलले की त्याला मोकळे वाटेल, बोलणं ही त्याची गरज आहे म्हणून
त्यानं बोललं पाहिजे.’ पण ही तिची फार मोठी चूक असते. तिच्या हे लक्षात येत
नाही की त्यानं बोलणं ही तिची गरज असते, त्याची नव्हे. जितकी ती
बोलण्यासाठी त्याचा पिच्छा पुरवेल तितका तो मूग गिळून बसेल. पुरुषाकडे ऐकून
घेण्याची कला मात्र असते. म्हणून तो जेव्हा ऐकून घेतो तेव्हा त्याचं कौतुक
करा. मग तो हळूहळू खुलतो व मनमोकळेपणाने बोलतो.
जेव्हा पुरुषाच्या लक्षात येतं की आपल्यावर बोलण्याची जबरदस्ती नाही तेव्हाच तो बोलू लागतो.
No comments:
Post a Comment