Monday, December 28, 2015

शबरीमला, हॅपी टू ब्लीड, राइट टू पी

कधीकधी संपूर्ण वर्षाभरातल्या सगळ्याच घडामोडींवर एखाद्याच घटनेचा मोठा प्रभाव पडलेला
असतो. मागच्या वर्षी २०१४मध्ल्या बऱ्याचशा घडामोडी देशातल्या निवडणुकांशी जोडलेल्या
होत्या. पण यावर्षी मात्र देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या घटनांवरती स्त्रीवादी
विचारांचा मोठा प्रभाव पडल्याचं ठळकपणे लक्षात आलं. गेल्या महिन्यात शबरीमला
देवळाविरुद्ध उभी राहिलेली 'हॅपी टू ब्लीड' मोहिम आणि नंतर शिंगणापूरला शनिमंदिराच्या
चौथऱ्यावर एक मुलगी गेल्यावर झालेला गदारोळ यानिमित्ताने महिलांनी सांस्कृतिक परिसर
चांगलाच दणाणून सोडला. पण त्याच्याही आधी वर्षभर अनेक क्षेत्रांमध्ये महिलांच्या संघटित
विद्रोहाचे धुमारे फुटताना दिसत होते. मुख्य म्हणजे या सगळ्या उठावात सर्वसामान्य स्त्रिया
सहभागी झाल्या. येणारं वर्ष किंवा येणारा काळ महिलांसाठी आव्हानात्मक असेल पण या
आव्हानांचा मुकाबला करताना आत्मसन्मानासाठी आम्ही प्रसंगी उठावही करू शकतो, हे सरत्या
वर्षात असंख्य मायलेकींनी दाखवून दिलं आहे.


सरत्या वर्षाला निरोप देताना काय मागे राहिलं याची उजळणी करायची ठरवली तर, या
वर्षात सर्व स्तरांतल्या महिलांमध्ये आलेली जागृती आणि त्यांनी फडकवलेलं बंडाचं निशाण ही
ठळक खूण दिसेल, जी येत्या अनेक वर्षांत उग्र होत जाणार आहे...


निरुद्देश भटकण्याची मोहीम

मुंबईतील महिलांच्या सुरक्षिततेच्या कल्पना वास्तव आणि गरजा यांच्याविषयी २०१० मध्ये
शिल्पा फडके, शिल्पा रानडे आणि समीरा खान या तीनजणींनी 'जेन्डर अँड स्पेस' प्रकल्पाच्या
अंतर्गत एक अभ्यास केला होता. त्यात असे दिसून आले होते की रस्त्यावर पुरेसे दिवे नसणे,
सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव आणि महिलांच्या हिंडण्या फिरण्यावर असलेली सामाजिक बंधने
अशा कारणांमुळे बहुसंख्य महिलांना मोकळेपणा वाटत नाही. तसेच, जितक्या जास्त महिला
वेगवेगळ्या वेळी सार्वजनिक ठिकाणी दिसतील तितके इतर महिलांना घराबाहेर जास्त सुरक्षित
वाटते. दिल्लीतील निर्भया बलात्कार घटनेला १६ डिसेंबर २०१४ रोजी दोन वर्षं झाल्याच्या
निमित्ताने या तिघींनी 'व्हाय लॉयटर' ही एक ऑनलाइन मोहीम सुरू केली. १६ डिसेंबर ते १
जानेवारी या काळात एकटीने अथवा इतर महिलांसोबत दिवसाच्या कोणत्याही प्रहरी,
विशेषकरून सातच्या नंतर बाहेर पडायचं आणि त्याचं छायाचित्र फेसबुक व ट्विटरवर शेअर
करायचं. पुरुष जसे सहज फिरायला बाहेर पडतात, तसं मुली/महिलांनी बाहेर पडावं, अशी
कल्पना होती. या मोहिमेला केवळ मुंबईतूनच नव्हे तर जगभरातून उत्साहाने प्रतिसाद मिळाला.
मुख्य म्हणजे, १ जानेवारीनंतर ही मोहीम विरून गेली नाही, तर अनेक ठिकाणी बायकांनी
निरुद्देश भटकायला निघण्यासाठी प्रत्यक्ष भेटून गट सुरू केले. तेव्हापासून बंगलोर, गुरगाव आणि
मुंबईत देखील आता अनेक तरूण मुली सातत्याने एकत्र जमत आहेत. कधी त्या रस्त्यावरच्या
लहानशा टपरीवर उभ्या राहून चहा घेतात, एखाद्या बागेत रात्री झोपण्यासाठी जमतात आणि
रस्त्यांवर निरुद्देश भटकण्याचा, कारणांशिवाय सार्वजनिक जागी मोकळेपणाने वावरण्याचा हक्क
प्रस्थापित करतात.

विमेन फाइट बॅक

सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हा सगळ्या वयाच्या मुलींना किती
महत्त्वाचा वाटतो, ते मला धारावीतल्या मुलींना भेटल्यावर जाणवले. इथल्या काही शाळकरी
मुलींनी 'तेक्नोव्हेष्ण' नावाच्या अंतरराष्ट्रीय प्रकल्पात भाग घेऊन महिलांसाठी 'विमेन फाइट
बॅक' नावाचे मोबाईल अॅप बनवले आहे. त्याचा उपयोग संकटात सापडलेल्या महिलेला आपल्या
मित्रमैत्रिणीपर्यंत माहिती पोचवण्यासाठी किंवा मदतीसाठी लोक जमा करण्यासाठी होऊ
शकतो. त्याशिवाय वाचन आणि गणित शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून 'पढाई मेरा हक'
नावाचे अॅपसुद्धा त्यांनी बनवलेले आहे. वस्तीत पाणी येण्याची वेळ समजावी, पाण्याचा नंबर
लावता यावा, त्यामुळे नळावरची भांडणे टाळता यावीत आणि बायकांचा वेळ वाचवा याकरिता
'पानी है जीवन' हे आणखी एक अॅप तयार केले आहे. आपले प्रश्न समजून घेऊन त्यावर
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करण्याची त्यांची वृत्ती मला फारच आकर्षक वाटली.

रक्तस्राव गंदा नही होता

'इंडियाज डॉटर' ही दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेशी संबंधित डॉक्युमेंटरी
दाखवली जावी की नाही, ह्या प्रश्नामुळे मार्च महिना गाजला होता. विविध स्त्रीवादी
संस्थांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या पण सर्वसामान्य महिलांनी आणि पुरुषांनीही सोशल
मिडियाच्या मदतीने हा माहितीपट पाहिला. त्यावर चर्चा केली आणि त्यावर बंदी
घालण्याचा सरकारी निर्णय अयोग्य असल्याचे दाखवून दिले.

त्याच सुमारास जामिया मिलीया इस्लामिया युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनींनी 'pads
against sexism' या नावाची अभिनव मोहीम सुरू केली होती. सॅनिटरी पॅडवरती महिलांवर
होणाऱ्या हिंसेच्या विरोधात संदेश लिहून ती पॅडस् रस्तोरस्ती त्यांनी झाडे, खांब, फलक अशा
ठिकाणी चिकटवली होती. या मोहिमेला देखील मोठा प्रतिसाद मिळालेला होता. अनेक
पुरुषांनी देखील 'माहवारी का रक्तस्राव गंदा नहीं होता बल्कि आपकी सोच गंदी है',
'दिल्ली की सड़कों पर महिलाओं का भी हक है', 'माहवारी होना सामान्य बात है, पर
दुष्कर्म नहीं' असे संदेश लिहिलेल्या सॅनिटरी पॅडसोबत फोटो काढून ते फेसबुक वरती लावले होते.

अत्याचारांचा जाहीर उच्चार

'ब्रेकथ्रू' या अंतर राष्ट्रीय संस्थेने भारतातल्या विविध शहरांत केलेला सर्वेक्षणाचा अहवाल
प्रकाशित झाला आणि ८३.५% महिलांनी बसथांबे आणि रेल्वे स्टेशन्सवर देखील असुरक्षित वाटत
असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती उजेडात आली. ५२ टक्के मुलींनी टक लावून पाहणे, ३९%
मुलींनी चिमटे काढले जाणे, धक्के मारले जाणे इ बाबींचा आणि २९ % मुलींनी पाठलाग केला
जाण्याचा त्रास झाल्याचे सांगितले होते. यानंतर मे महिन्यापासून 'ब्रेकथ्रू' संस्थेतर्फे या
सर्व्हेवर आधारित मुद्द्यांविषयी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली.

मुस्लिम महिलांची मोहीम

बऱ्याच आफ्रिकन देशांत महिलांच्या योनीचा काही भाग कापण्यात येतो, ही माहिती
अनेकांच्या ऐकिवात देखील नसते. पण नायजेरियात या प्रथेवर कायद्याने बंदी घातल्याची
बातमी प्रकाशीत झाली आणि त्यानिमित्ताने आलेल्या लेखांतून आपल्या देशातही अशी प्रथा सुरु
असल्याचे अनेकांना समजले. बोहरा मुस्लिम समाजातील मुंबईतील काही महिलांनी या प्रथेविरुद्ध
मोहीम उभारली आहे. जनहित याचिका देखील दाखल केली आहे, हे कळल्यावर अनेकांनी
त्याविषयी अधिक माहिती त्यांच्या वेबसाईट वरून मिळवली.

अनौक नावाच्या एका कपड्यांच्या ब्रॅण्डने 'बोल्ड इज ब्युटीफुल' या शीर्षकाने काही
जाहिराती केल्या. त्यात अनेक यशस्वी महिलांनी भाग घेतला होता. शिवाय एकटीने मुलीला
वाढवणारी आई, लेस्बियन मैत्रिणी अशी उदाहरणे देणाऱ्या काही जाहिराती होत्या.
त्यातल्या समलैंगिकतेचा उल्लेख करणारी जाहिरात खूपच गाजली होती. त्या जाहिरातीला
मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. समलैंगिकता ह्या मुद्द्याकडे आजची पिढी तरी
तिरस्काराने पाहत नाही, हेच विविध माध्यमांतून व्यक्त झालेल्या मतांमधून यावेळी दिसले.

जाचक नियमांचा 'पिंजरातोड'

दिल्लीत अनेक विद्यापीठांची होस्टेल्स आहेत. मुलींच्या वसतिगृहात विशेषत: १६ डिसेंबर
२०१२ला घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षिततेच्या कारणाखाली अनेक
जाचक निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे मुलींना वाचनालये, प्रयोगशाळा अशा सुविधांचाही
उपयोग करता येत नाही आणि शिक्षणाच्या मुलभूत हक्कांवर गदा येते आहे. एकप्रकारे समाजातील
पितृसत्ताक व्यवस्थेचे प्रतिबिंबच या नियमांतून दिसून येते, असे अनेक विद्यार्थिनींना वाटते.
या निर्बंधांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि विमेन्स कमिशनने यात लक्ष घालावे या
मागणीसाठी त्यांनी ऑगस्ट महिन्यात 'पिंजरातोड' मोहीम सुरू केली. या मोहिमेत आता
देशभरातील हजारो मुली सामील होत आहेत. .

याच सुमारास 'अक्षरा' या मुंबईतल्या संस्थेशी जोडलेल्या तरूण मुलींनी पुढाकार घेऊन वृत्तपत्रे
वाचण्यासाठी असलेल्या मोफत वाचनालयात जाण्याची पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. अशा
मोफत वाचनालयात स्त्रियांनीदेखील जाण्याची मोहीम त्यांनी सुरु केली. त्याला आजही विविध
वस्त्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

मंदिर प्रवेश

नोव्हेंबर महिना स्त्रीवादी विचारांनी केलेल्या कृतींनी आणि त्याला मिळणाऱ्या पाठिंब्याने
भारलेला होता! निकिता आझाद ह्या कोलकात्याच्या मुलीने शबरीमला देवस्थानच्या प्रमुखाने
महिलांना देवळात प्रवेशाला बंदी चा नियम कायम ठेवण्याचा निर्णय कायम केल्याचा निषेध
म्हणून Happy to bleed मोहीम सुरू केली. त्यापाठोपाठ शिंगणापूरला शनीच्या चौथऱ्यावर
एका मुलीने पाय रोवला. त्यामुळे देवाला दुधाची अंघोळ घातली गेली.

राइट टू पी

बीबीसीकडून जगातल्या १०० प्रेरणादायक महिलांची जी यादी प्रकाशित झाली, त्यात मुमताज
शेखचा गौरव पूर्ण उल्लेख आहे. नोव्हेंबरमध्ये मुमताजच्या अनेक मुलाखती प्रसिद्ध झाल्या आणि
'राइट टू पी' मोहीम जास्त लोकांपर्यंत पोचली. गेल्या तीन-चार वर्षांपासून 'कोरो' या
संस्थेशी जोडलेल्या मुमताज शेख आणि सुप्रिया या दोन मैत्रिणी मुंबईत स्त्रियांसाठी मुताऱ्या
मिळाव्यात याकरिता लढा उभारत होत्या. मुंबईतल्या घराबाहेर पडून काम करणाऱ्या
महिलांना स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्यामुळे दिवसभर कमीत कमी पाणी
फिन काम करत अनेक महिलांनी मूत्रमार्गाच्या आजारांना तोंड दिले. आजही अनेक महिलांना हा
त्रास सहन करावा लागतो. मुंबईत घराबाहेर पडून काम करणाऱ्या महिलांची संख्या जरी
वाढली असली तरी महिलांसाठी एकही मुतारी मुंबईत नव्हती. महिला व पुरुष दोघांसाठी
असलेली जी जोडलेली सार्वजनिक स्वच्छतागृह असतात, त्यांची स्वच्छता आणि सुरक्षितता अवस्था
अतिशय वाईट असते. अनेकदा महिलांचा विभाग पुरुषच वापरतात किंवा तिथे पाणी उपलब्ध
नसते. तरीही स्वच्छतागृह वापरण्यासाठी महिलांना दोन ते पाच रुपयांपर्यंत कितीही शुल्क
द्यावे लागत असे. पण या सगळ्या अन्याया विरुद्ध आता मुंबईतल्या ३५ स्वयंसेवी संस्था एकत्र
आल्या आहेत. या विषयावर 'मिळून साऱ्याजणी' मासिकामार्फत केलेल्या जनहित याचिकेवर
निकाल देताना हायकोर्टाने राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना महिलांसाठी स्वच्छ
आणि सुरक्षित स्वच्छतागृह बांधायचे आदेश दिले आहेत. बजेटमध्येही काही तरतुदी केल्या गेल्या
आहेत. त्या अमलात येण्यासाठी अजून खूप रेटा लावावा लागणार आहे. पण चळवळीला मिळणारा
पाठिंबा नक्की वाढतो आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रब्बुलनी


'बाजीराव-मस्तानी' ‌सिनेमाच्या निमित्ताने अद्याप उ‍लटसुलट चर्चा सुरू आहे. पण
बाजीरावांचा पराक्रम आणि मोठेपण मराठ्यांना अजून कसं पुरतं उमगलेलं नाही, याची जाणीव
करुन देणारा लेख...

जेमतेम चाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये बाजीराव चोवीस वर्षं सतत झुंजत राहिले.
घोड्याची पाठ हेच त्यांचे वस्तीस्थान होते. महालापेक्षा ते रणांगणावरच जास्त राहिले.
त्यांच्या हृदयात छत्रपती ‌शाहूमहाराजांचा आदेश होता आणि नजरेत स्वराज्याचे साम्राज्य
बनविण्याची आस होती आणि ती त्यांनी पूर्ण केली.

 निजाम उल मुल्क यांच्या पत्रातून थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख हा 'रब्बुलनी' असा होत
असे. रब्बुलनी याचा अर्थ मराठी मुलखाचे नवे आराध्य दैवत. कादंबरी व नाटकातून
हौशागौशांनी 'बाजीराव-मस्तानी' यांची प्रेमकथा कितीही रंगवली तरी ती इतिहासाला
धरून नाही. बाजीराव हे स्वराज्याचे उद्धारक आणि रक्षणकर्ते ठरतात. हे त्यांनी त्यांच्या
अतुलनीय पराक्रमाने सिद्ध करून दाखविले आहे आणि म्हणूनच त्यांना अखंड हिंदुस्थान
'शहामतपनाह' आणि 'साहबे फुतुहाते उज्जाम' या बिरुदावलीने ओळखत असे. शहामतपनाह याचा
अर्थ शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारा. तर साहबे फुतुहाते उज्जाम म्हणजे अजिंक्य, अजेय बाजीराव!



शाहूमहाराज (शंभुराजांचे चिरंजीव) यांची कैदेतून सुटका झाली आणि ते साताऱ्यास आले. तेव्हा
बाळाजी विश्वनाथांनी आपली निष्ठा शाहूराजांच्या चरणी वाहिली. पेशवे म्हणून काम करताना
त्यांनी बंडखोर सरदारांचा बंदोबस्त केला. मराठी राज्य स्थिर होत असतानाच बाळाजी
विश्वनाथ यांचे निधन झाले. तेव्हा बाजीरावांचे वय होते २० वर्षे. बाजीरावांची पेशवेपदी
निवड ही एकच गोष्ट शाहूमहाराजांच्या कार्यक्षमतेची, मुत्सद्दीपणाची साक्ष देते.
बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी
नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना
इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही.
पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत
बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड
राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याची बैल खाऊ लागले. बाजीरावांनी
दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली
हादरली. परंतु 'दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही' या पत्रामुळे
बाजीरावांनी दिल्ली हातात आली असतानाही सोडून दिली. कर्नाटक, राजस्थान, माळवा,
बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्रप्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या.
या मुलखात मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त
बाजीराव पेशवे.

त्यामुळे इथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की, 'बाजीराव आणि मस्तानी' हा विषय
चव्हाट्यावरील प्रेमाचा नाही. तो अत्यंत गांभीर्याने आणि आदराने पाहावयाचा विषय आहे.
मुळात याविषयी काही बोलताना, लिहिताना आदराने उल्लेख व्हायला हवा आणि मस्तानीबाई
यांचाही सौभाग्यवती बाईसाहेब असाच उल्लेख हवा! कारण आज बाजीरावांचे भारतीय
इतिहासात फार मोठे योगदान आहे. ज्यावेळी इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा हिंदुस्थानावर
चालून आला, त्याने दिल्लीचे तख्त नेस्तनाबूत केले, तेव्हा बाजीरावांनी काळाची पावले ओळखून
म्हटले होते 'परराज्य राहील तर सर्वावर आहे.' हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लिम यांनी या
नादिरशहाचा सर्व शक्तिनिशी मुकाबला करावा असा इशारा देणारे बाजीराव हे
हिंदुस्थानातील पहिले मुत्सद्दी होते. परंतु लोक मात्र बाजीरावाच्या पराक्रमाबद्दल कमी
आणि प्रेमाबद्दलच जास्त विचार करतात.

आता आपण हे पाहू या की मस्तानीबाई कोण होत्या. मस्तानीबाई या राजकन्या होत्या.
बुंदेलखंडाचे ककाजू महाराज अर्थात छत्रसाल राजा हे मस्तानीबाईंचे वडील होते. छत्रसाल राजा
हे पराक्रमी, धाडसी व वैभ‍वशाली होते. शि‍वरायांच्या प्रेरणेने त्यांनी मोघलांविरुद्ध सुरू
केलेला लढा ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष होती. छत्रसाल हिंदू होते पण त्यांची
विचारधारा ही प्रणामी पंथाची होती. हा पंथ त्या काळात बुंदेलखंडापासून गुजरातपर्यंत
पसरला होता. या पंथात ईश्वर, अल्ला, कुराण-गीता एक मानले जाते. नमाज, प्रार्थना,
पूजा, इबादत एकच.

महमंद बंगश या कडव्या पठाणाचे ज्यावेळी बुंदेलखंडावर आक्रमण झाले तेव्हा छत्रसाल राजाचे वय
झाले होते. बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिले-

जो गती ग्राह गजेंद्र की सो गत भई है आज।

बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज।।

हे पत्र मिळताच बाजीराव बुंदेलखंडास वायूवेगाने गेले आणि बंगशच्या कडव्या फौजेला पराभूत केले.
छत्रसाल राजाची मुक्तता झाली. बुंदेलजनता सुखावली. तिने विजयोत्सव साजरा केला. तेव्हा
एका मेजवानीत छत्रसाल राजाने बाजीरावाकडे मस्तानीच्या लग्नाची विचारणा केली, तेव्हा
बाजीराव तयार झाले नाहीत. बाजीरावांचे लग्न झाले होते. त्यांना काशीबाई नावाची सुंदर,
सुस्वरूप पत्नी होती. पुत्र नानासाहेबांचा जन्म झाला होता. परंतु यामध्ये सरदार
पिलाजीराव जाधव, मल्हारराव होळकर यांनी पुढाकार घेतला, आग्रह धरला. बाजीरावांनीही
विचार केला की, आपले लक्ष हे दिल्ली आहे. दिल्ली जिंकावयाची असेल तर बुंदेलखंडात आपली
माणसे हवीत. महाराष्ट्रातून जेव्हा दिल्लीच्या दिशेने फौज निघेल, तेव्हा दिल्लीपर्यंत तिची
दमछाक होईल. त्यासाठी विश्रांती आणि ताज्या दमाची दुसरी फौज मिळाली तर दिल्ली
जिंकणे कठीण नाही आणि त्यासाठी बुंदेलखंडात नाते हवे, हा विचार करून बाजीरावांनी होकार
दिला. त्यांचा मस्तानीबाईशी खांडा पद्धतीने विवाह झाला.

बाजीराव मस्तानीबाईसाहेबांना घेऊन जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातभर पंचा नेसणाऱ्या आणि
चालीरूढीत अडकलेल्या संकुचित तथाकथितांना धक्का बसला. परंतु बाजीरावांनी त्यांची पर्वा
केली नाही. पुण्यातील सरदार धडफळे यांच्या वाड्यात मस्तानीबाईंचा बंदोबस्त करून ते
तातडीने गुजरात मोहिमेवर गेले. ही मो‌हीम कित्येक महिने चालली. बाजीराव जर
मस्तानीबाईंच्या सौंदर्याने वेडे झाले असते तर त्यांनी ही मोहीम हाती घेतली असती का?
नाही. परंतु बाजीराव हे काळाच्या पुढे पहात होते. त्यांची दृष्टी ही दिल्लीवर होती.

बाजीराव हे सर्वार्थाने थोरले होते. युद्धकलेत, माणुसकीत, अश्वकलेत, मैत्रीत, राजकारणात,
राजनिष्ठेत, कुटुंबवत्सलतेत ते थोरले होते. त्यांचे हे थोरलेपण एवढे विराट आणि विशाल झाले
की, आजही देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला, 'तुम क्या बाजीराव हो क्या?' किंवा
'बाजीराव का बेटा' अशा म्हणी, वाक्यप्रचार रूढ झाल्या. तीन शतकानंतरही लोक बाजीराव
हा शब्द विसरले नाहीत.

बाजीरावांचा कडवा शत्रू निजामही बाजीरावांच्या बद्दल म्हणतो की, 'एक बाजी, बाकी सब
पाजी.' या एका वाक्यात बाजीरावांची योग्यता कळते. पण ही योग्यता महाराष्ट्राला
कधीही उमगली नाही, हे दुर्दैव.

त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत
आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत,
त्यांच्या रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी
तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय
पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय
पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील
शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले.
धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या. दुसरी गोष्ट मस्तानीबाईंशी
लग्न केल्यानंतरही त्यांचे काशीबाईशी संबंध प्रेमाचेच राहिले. त्यांनी काशीबाईंना उत्तम
वागणूक दिली, सन्मान दिला. मस्तानीबाई जीवनात आल्यानंतरही काशीबाईंना रघुनाथ,
जनार्दन, रामचंद्र अशी तीन अपत्ये झाली. मुळातच बाजीरावावर काशीबाई व मस्तानीबाई
यांचे अत्यंत उत्कट प्रेम होते. पण रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या
होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त
केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या
अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम
जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले.
महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे
बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्नी बाकी सर्व
स्त्रिया मला मायबहिणी.

बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता. म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला
जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड
करेन.' एवढा एकच उद्‍गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली
तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात
रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुर्नरचना झाली.
शि‍वरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.

प्रचंड पराक्रमी वर्णनातित विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले
बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी
निधन झाले. बाजीरावांच्या निधनाची खबर मिळताच खुद्द निजामही रडला. सर जदुनाथ
सरकार लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'

'श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान

बाजीराव बल्लाळ पंतप्रधान'

ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील
कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यातून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी
अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला,
अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर
सांभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान
मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले
नाहीत. खऱ्या अर्थाने ते कर्तबगार, खऱ्या अर्थाने थोरले, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत होते.
म्हणूनच आजही भारतीय जनतेला शहामतपनाह श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची स्मृती ही
प्रेरणा देणारी आहे!