'बाजीराव-मस्तानी' सिनेमाच्या निमित्ताने अद्याप उलटसुलट चर्चा सुरू आहे. पण
बाजीरावांचा पराक्रम आणि मोठेपण मराठ्यांना अजून कसं पुरतं उमगलेलं नाही, याची जाणीव
करुन देणारा लेख...
जेमतेम चाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये बाजीराव चोवीस वर्षं सतत झुंजत राहिले.
घोड्याची पाठ हेच त्यांचे वस्तीस्थान होते. महालापेक्षा ते रणांगणावरच जास्त राहिले.
त्यांच्या हृदयात छत्रपती शाहूमहाराजांचा आदेश होता आणि नजरेत स्वराज्याचे साम्राज्य
बनविण्याची आस होती आणि ती त्यांनी पूर्ण केली.
निजाम उल मुल्क यांच्या पत्रातून थोरले बाजीराव पेशवे यांचा उल्लेख हा 'रब्बुलनी' असा होत
असे. रब्बुलनी याचा अर्थ मराठी मुलखाचे नवे आराध्य दैवत. कादंबरी व नाटकातून
हौशागौशांनी 'बाजीराव-मस्तानी' यांची प्रेमकथा कितीही रंगवली तरी ती इतिहासाला
धरून नाही. बाजीराव हे स्वराज्याचे उद्धारक आणि रक्षणकर्ते ठरतात. हे त्यांनी त्यांच्या
अतुलनीय पराक्रमाने सिद्ध करून दाखविले आहे आणि म्हणूनच त्यांना अखंड हिंदुस्थान
'शहामतपनाह' आणि 'साहबे फुतुहाते उज्जाम' या बिरुदावलीने ओळखत असे. शहामतपनाह याचा
अर्थ शत्रूच्या हृदयात धडकी भरवणारा. तर साहबे फुतुहाते उज्जाम म्हणजे अजिंक्य, अजेय बाजीराव!
शाहूमहाराज (शंभुराजांचे चिरंजीव) यांची कैदेतून सुटका झाली आणि ते साताऱ्यास आले. तेव्हा
बाळाजी विश्वनाथांनी आपली निष्ठा शाहूराजांच्या चरणी वाहिली. पेशवे म्हणून काम करताना
त्यांनी बंडखोर सरदारांचा बंदोबस्त केला. मराठी राज्य स्थिर होत असतानाच बाळाजी
विश्वनाथ यांचे निधन झाले. तेव्हा बाजीरावांचे वय होते २० वर्षे. बाजीरावांची पेशवेपदी
निवड ही एकच गोष्ट शाहूमहाराजांच्या कार्यक्षमतेची, मुत्सद्दीपणाची साक्ष देते.
बाजीरावांनी वयाच्या अकराव्या वर्षीच दिल्ली पाहिली होती. सर्व हिंदुस्थान त्यांनी
नजरेत भरून घेतला होता. त्यांनी गाजवलेल्या मोहिमा लोकांना परिचित नाहीत. किंबहुना
इतिहासकारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्या आहेत म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही.
पालखेडची निजामाविरोधातील मोहीम, त्यानंतर भोपाळची मोहीम येथील एका लढाईत
बाजीरावांनी निजामाची फारच दारुण अवस्था केली. निजाम ढेकळाची भिंत रचून त्याच्या आड
राहू लागला. सैनिकांची रसद बंद झाल्यामुळे ते तोफखान्याची बैल खाऊ लागले. बाजीरावांनी
दिल्लीवर स्वारी केली. तेव्हा तत्कालीन बादशहा जीव मुठीत धरून लपून बसला. संपूर्ण दिल्ली
हादरली. परंतु 'दिल्ली महास्थळ पातशहा बरबाद जालियात फायदा नाही' या पत्रामुळे
बाजीरावांनी दिल्ली हातात आली असतानाही सोडून दिली. कर्नाटक, राजस्थान, माळवा,
बुंदेलखंड, गुजरात, दिल्ली, कोकण, आंध्रप्रदेश येथे मराठ्यांच्या कार्याच्या कक्षा रुंदावल्या.
या मुलखात मराठी माणसांचा प्रवेश झाला. नंतर स्थायिक झाले यास कारण फक्त आणि फक्त
बाजीराव पेशवे.
त्यामुळे इथे एक गोष्ट नमूद कराविशी वाटते की, 'बाजीराव आणि मस्तानी' हा विषय
चव्हाट्यावरील प्रेमाचा नाही. तो अत्यंत गांभीर्याने आणि आदराने पाहावयाचा विषय आहे.
मुळात याविषयी काही बोलताना, लिहिताना आदराने उल्लेख व्हायला हवा आणि मस्तानीबाई
यांचाही सौभाग्यवती बाईसाहेब असाच उल्लेख हवा! कारण आज बाजीरावांचे भारतीय
इतिहासात फार मोठे योगदान आहे. ज्यावेळी इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा हिंदुस्थानावर
चालून आला, त्याने दिल्लीचे तख्त नेस्तनाबूत केले, तेव्हा बाजीरावांनी काळाची पावले ओळखून
म्हटले होते 'परराज्य राहील तर सर्वावर आहे.' हिंदुस्थानातील हिंदू-मुस्लिम यांनी या
नादिरशहाचा सर्व शक्तिनिशी मुकाबला करावा असा इशारा देणारे बाजीराव हे
हिंदुस्थानातील पहिले मुत्सद्दी होते. परंतु लोक मात्र बाजीरावाच्या पराक्रमाबद्दल कमी
आणि प्रेमाबद्दलच जास्त विचार करतात.
आता आपण हे पाहू या की मस्तानीबाई कोण होत्या. मस्तानीबाई या राजकन्या होत्या.
बुंदेलखंडाचे ककाजू महाराज अर्थात छत्रसाल राजा हे मस्तानीबाईंचे वडील होते. छत्रसाल राजा
हे पराक्रमी, धाडसी व वैभवशाली होते. शिवरायांच्या प्रेरणेने त्यांनी मोघलांविरुद्ध सुरू
केलेला लढा ही त्यांच्या पराक्रमाची साक्ष होती. छत्रसाल हिंदू होते पण त्यांची
विचारधारा ही प्रणामी पंथाची होती. हा पंथ त्या काळात बुंदेलखंडापासून गुजरातपर्यंत
पसरला होता. या पंथात ईश्वर, अल्ला, कुराण-गीता एक मानले जाते. नमाज, प्रार्थना,
पूजा, इबादत एकच.
महमंद बंगश या कडव्या पठाणाचे ज्यावेळी बुंदेलखंडावर आक्रमण झाले तेव्हा छत्रसाल राजाचे वय
झाले होते. बुंदेलखंडाचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिले-
जो गती ग्राह गजेंद्र की सो गत भई है आज।
बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज।।
हे पत्र मिळताच बाजीराव बुंदेलखंडास वायूवेगाने गेले आणि बंगशच्या कडव्या फौजेला पराभूत केले.
छत्रसाल राजाची मुक्तता झाली. बुंदेलजनता सुखावली. तिने विजयोत्सव साजरा केला. तेव्हा
एका मेजवानीत छत्रसाल राजाने बाजीरावाकडे मस्तानीच्या लग्नाची विचारणा केली, तेव्हा
बाजीराव तयार झाले नाहीत. बाजीरावांचे लग्न झाले होते. त्यांना काशीबाई नावाची सुंदर,
सुस्वरूप पत्नी होती. पुत्र नानासाहेबांचा जन्म झाला होता. परंतु यामध्ये सरदार
पिलाजीराव जाधव, मल्हारराव होळकर यांनी पुढाकार घेतला, आग्रह धरला. बाजीरावांनीही
विचार केला की, आपले लक्ष हे दिल्ली आहे. दिल्ली जिंकावयाची असेल तर बुंदेलखंडात आपली
माणसे हवीत. महाराष्ट्रातून जेव्हा दिल्लीच्या दिशेने फौज निघेल, तेव्हा दिल्लीपर्यंत तिची
दमछाक होईल. त्यासाठी विश्रांती आणि ताज्या दमाची दुसरी फौज मिळाली तर दिल्ली
जिंकणे कठीण नाही आणि त्यासाठी बुंदेलखंडात नाते हवे, हा विचार करून बाजीरावांनी होकार
दिला. त्यांचा मस्तानीबाईशी खांडा पद्धतीने विवाह झाला.
बाजीराव मस्तानीबाईसाहेबांना घेऊन जेव्हा पुण्यात आले, तेव्हा हातभर पंचा नेसणाऱ्या आणि
चालीरूढीत अडकलेल्या संकुचित तथाकथितांना धक्का बसला. परंतु बाजीरावांनी त्यांची पर्वा
केली नाही. पुण्यातील सरदार धडफळे यांच्या वाड्यात मस्तानीबाईंचा बंदोबस्त करून ते
तातडीने गुजरात मोहिमेवर गेले. ही मोहीम कित्येक महिने चालली. बाजीराव जर
मस्तानीबाईंच्या सौंदर्याने वेडे झाले असते तर त्यांनी ही मोहीम हाती घेतली असती का?
नाही. परंतु बाजीराव हे काळाच्या पुढे पहात होते. त्यांची दृष्टी ही दिल्लीवर होती.
बाजीराव हे सर्वार्थाने थोरले होते. युद्धकलेत, माणुसकीत, अश्वकलेत, मैत्रीत, राजकारणात,
राजनिष्ठेत, कुटुंबवत्सलतेत ते थोरले होते. त्यांचे हे थोरलेपण एवढे विराट आणि विशाल झाले
की, आजही देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला, 'तुम क्या बाजीराव हो क्या?' किंवा
'बाजीराव का बेटा' अशा म्हणी, वाक्यप्रचार रूढ झाल्या. तीन शतकानंतरही लोक बाजीराव
हा शब्द विसरले नाहीत.
बाजीरावांचा कडवा शत्रू निजामही बाजीरावांच्या बद्दल म्हणतो की, 'एक बाजी, बाकी सब
पाजी.' या एका वाक्यात बाजीरावांची योग्यता कळते. पण ही योग्यता महाराष्ट्राला
कधीही उमगली नाही, हे दुर्दैव.
त्यांनी कधीही देवधर्म यांचे अवडंबर केले नाही. जाती-पातीच्या परिघात ते अडकले नाहीत
आणि म्हणूनच बहुजन समाजातील सरदारांच्या, सैनिकांच्या मांडीला मांडी लावून ते जेवत,
त्यांच्या रमत. जे असेल ते खात. म्हणूनच पुण्यात धर्म मोडला आणि अभक्ष्य भक्षण केले यासाठी
तथाकथित पंडितांनी आकांडतांडव केले. परंतु बाजीरावांनी त्यांना भीक घातली नाही. द्वितीय
पत्नी मस्तानीबाईंचा पुत्र कृष्णसिंग अर्थात समशेरबहाद्दर (पुढे याने पानिपत युद्धात अतुलनीय
पराक्रम केला). याच्या हक्कासाठी ते जागरूक होते. त्याचे मौजीबंधन करण्यास पुण्यातील
शास्त्री, पंडिताचा विरोध होता. पण तो विरोध डावलून समशेरसिंगचे मौजीबंधन केले.
धर्मातील खुळचट कल्पना त्यांनी केव्हाच झुगारून दिल्या होत्या. दुसरी गोष्ट मस्तानीबाईंशी
लग्न केल्यानंतरही त्यांचे काशीबाईशी संबंध प्रेमाचेच राहिले. त्यांनी काशीबाईंना उत्तम
वागणूक दिली, सन्मान दिला. मस्तानीबाई जीवनात आल्यानंतरही काशीबाईंना रघुनाथ,
जनार्दन, रामचंद्र अशी तीन अपत्ये झाली. मुळातच बाजीरावावर काशीबाई व मस्तानीबाई
यांचे अत्यंत उत्कट प्रेम होते. पण रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या
होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त
केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या
अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम
जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले.
महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे
बाजीराव उद्गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्नी बाकी सर्व
स्त्रिया मला मायबहिणी.
बाजीराव पराक्रमी होते. त्यांच्याकडे दिलदारपणा होता. म्हणूनच शाहूमहाराज म्हणत, 'मला
जर एक लाख फौज व बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावाची निवड
करेन.' एवढा एकच उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली
तरी इतिहास हेच सांगतो, वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात
रूपांतर करणे ही असामान्य घटना होय. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुर्नरचना झाली.
शिवरायांच्या स्वराज्याचा वटवृक्ष झाला.
प्रचंड पराक्रमी वर्णनातित विद्वत्ता, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असे हे थोरले
बाजीराव आदर्श राष्ट्रपुरुष होते. दि. २८ एप्रिल १७४० रोजी वयाच्या फक्त ४०व्या वर्षी
निधन झाले. बाजीरावांच्या निधनाची खबर मिळताच खुद्द निजामही रडला. सर जदुनाथ
सरकार लिहितात, (इ. स. १९४२) 'अखंड हिंदुस्थानात हा एक अलौकिक पुरुष झाला असे दिसते.'
'श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान
बाजीराव बल्लाळ पंतप्रधान'
ही मुद्रा धारण करणाऱ्या बाजीरावांकडे कोणतेही छक्केपंजे नव्हते. ब्राह्मणांचा त्या काळातील
कर्मठपणाही नव्हता. नेपोलियनने जसे सामान्यातून मार्शल निर्माण केले तसे बाजीरावांनी
अठरापगड जाती-जमातीतून लढवय्यै सरदार निर्माण केले. संबंध भारतभूमीत स्फुल्लिंग पेटवला,
अस्मिता निर्माण केली. अस्थिर झालेल्या स्वराज्याला त्यांनी स्थिर केले. एवढेच नाही तर
सांभाव्य विस्ताराचा मार्ग आखून दिला. हिंदुस्थानच्या इतिहासात मराठ्यांना मानाचे स्थान
मिळवून दिले. एवढा बळकट शनिवारवाडा बांधून ते त्यात कधीही विश्रांतीसाठी थांबले
नाहीत. खऱ्या अर्थाने ते कर्तबगार, खऱ्या अर्थाने थोरले, खऱ्या अर्थाने ते श्रीमंत होते.
म्हणूनच आजही भारतीय जनतेला शहामतपनाह श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांची स्मृती ही
प्रेरणा देणारी आहे!