उन्हाळ्यात शरीरातील पचनशक्ती मंदावलेली असते, उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले) झालेले असतात. अर्थातच शरीरशक्तीसुद्धा कमी झालेली असते. मात्र आहार, आचरण, मानसिकता अशा सर्व परीने प्रयत्न केले, तर मात्र आरोग्य व्यवस्थित राहू शकते. वाढलेल्या उष्णतेशी जुळवून घेता यावे यासाठी शरीराने आपणहून केलेली तजवीज म्हणजे घामाचे वाढलेले प्रमाण. घाम अत्याधिक प्रमाणात येत असला आणि शरीरातही पित्तदोष, रक्तदोष वाढलेले असले तर घामोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले तसेच नाजूक त्वचा असणाऱ्यांनाही उन्हाळ्यामध्ये रॅश येण्याचा त्रास होऊ शकतो. यावर पुढीलप्रमाणे उपाय करता येतात-
उन्हाळा म्हटला, की लहान मुलांना सुट्ट्या, त्यानिमित्ताने होणारा प्रवास, आंब्याचा गोडवा, सरबत-थंडाई-आइस्क्रीमचा आनंद अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र, या सर्वांच्या पार्श्वभूमीवर असते वातावरणात वाढलेली उष्णता. या उष्णतेचे नियोजन केल्याशिवाय उन्हाळ्याचा आनंद घेता येत नाही. उन्हाळ्यात सहसा कोणकोणते त्रास होतात आणि ते होऊ नयेत म्हणून काय उपचार करावेत या सर्व विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत.
करायचे तरी काय?
स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरणे. मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होऊ शकते.
- श्रमाचे काम करणाऱ्यांना किंवा फार घाम येत असल्यास सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करणे उत्तम.
- कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालणे. फार घट्ट कपडे घालणे टाळणे.
- घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात.
- रक्तशुद्धीसाठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम.
उन्हाळी लागली तर... "उन्हाळ्या लागणे‘ या शब्दावरून हा त्रास उन्हाळ्यात होत असणार हे लक्षात येते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे हा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो. विशेषतः पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने उन्हाळी लागण्याची प्रवृत्ती तयार होते. यावर पुढील उपाय करता येतात.
- सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी किंवा धणे-जिऱ्याचे पाणी पिणे.
- अधूनमधून शहाळ्याचे पाणी पिणे.
- धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिणे.
- दुपारी उन्हाची तीव्रता वाढते. अशा वेळी लिंबाचे सरबत, कोकम सरबत किंवा शुद्धतेची खात्री असलेला उसाचा रस घेणे. उसाच्या रसात बर्फ टाकायचा असला तर तो चांगल्या पाण्यापासून तयार केलेला आहे याची खात्री असावी.
पचनशक्तीसाठी... कमी झालेली पचनशक्ती, जलतत्त्वाची कमतरता यांच्यामुळे शरीरात वाढणारी रुक्षता, उष्णता या सर्वांच्या एकत्रीकरणातून मलावष्टंभ, मूळव्याध, तोंड येणे वगैरे त्रासही या ऋतूत होताना दिसतात. यावर पुढील उपाययोजना करता येते.
- आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकुल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
- भिजत घातलेली एक-दोन अंजिरे, मूठभर काळ्या मनुका रोज सेवन करणे.
- संध्याकाळच्या जेवणात वरण-भात, मऊ खिचडी, वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा धान्यांचे सूप यांचा समावेश असणे.
घोळणा फुटल्यास... उन्हाळ्याची उष्णता बाधल्याने नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्त येऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास होताना दिसतो. डोक्यावर थंड पाणी लावणे, शक्य असल्यास आवळ्याचे चूर्ण व पाणी एकत्र करून तयार केलेला लेप टाळूवर लावणे यामुळे रक्त थांबण्यास मदत होते. मात्र वारंवार त्रास होत असल्यास पुढील उपायांची योजना करता येते.
- अडुळशाच्या पानांचा रस (अर्धा ते एक चमचा) त्यात खडीसाखर घालून रोज घेणे.
- कोहळ्याचा रस खडीसाखर टाकून घेण्यानेही नाकातून वारंवार रक्त पडण्याचे थांबते.
- रात्री झोपण्यापूर्वी घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा नस्यसॅन घृताचे नाकात दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होतो.
- ज्येष्ठमध व मनुका यांचा काढा करून घेण्यानेही नाकातून रक्त येणे थांबते.
... अंग अंग जाळी उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते. उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ-संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते.
- उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते.
- उन्हाळ्यात डोळ्याची जळजळ होणेही स्वाभाविक असते. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याचा किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो.
- कोरफडीचा गर बंद डोळ्यांवर ठेवण्यानेही डोळ्यांची आग, लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.
शीततेचा संस्कार
- गुलकंद व मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या व खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साह्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक्त असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्चित कमी होतो.
कधी कधी उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही अशा वेळी मुगाचे कढण पिणे सर्वांत चांगले. मूग वीर्याने थंड असून पचायला हलके असतातच; पण ताकद कायम ठेवणारेही असतात. मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्धा वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, एक-दोन आमसुले, पाच-सहा मनुका व चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता-पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.
पचनशक्ती कमी झालेली असल्याने उन्हाळ्यात प्यायचे पाणी उकळून घेणे चांगले होय. त्यावरही शीततेचा संस्कार व्हावा म्हणून वाळ्याचे बारीक तुकडे, चंदन चुरा, बडीशेप, धणे वगैरे गोष्टी समप्रमाणात एकत्र केलेले मिश्रण किंवा तयार जलसंतुलन पाणी उकळताना पाच लिटर पाण्याला अर्धा चमचा या प्रमाणात टाकता येते. उकळी आल्यावर मंद आचेवर 10-15 मिनिटे ठेवून नंतर गाळून मातीच्या घड्यात भरून पिण्यासाठी वापरणे उत्तम होय.
अशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुरवातीपासून साध्या साध्या उपायांची योजना केली तर कोणताही त्रास न होता उन्हाळ्याचा आनंद घेता येईल.